देवगिरी--पैठण शैक्षणिक सहल...

School Trip To Devgiri Fort, Aurangabad

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.

एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.

राष्ट्रकुट राज्यातील र्शीवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारतातील इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.

महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. 21व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोर्‍याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ 70 फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक 180 स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे.

राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल दौलताबाद किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ. स. 1318 मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ. स. 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. 1950 मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1500 वर्णांच्या सुखद व दु:खद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही.

Comments

Popular posts from this blog

" शिक्षक दिन - ५ सप्टेंबर "

" हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड."

हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा-- बहिर्जी नाईक.